readenglishbook.com » Essay » Vilkha, Nishad Kanhere [good books for high schoolers txt] 📗

Book online «Vilkha, Nishad Kanhere [good books for high schoolers txt] 📗». Author Nishad Kanhere



विळखा

 

एका शनिवारी आम्ही सगळे ४ दिवसांची सुट्टी असल्यामुळे kemah boardwalk ला गेलो होतो. १-२ मैलपासुनच सगळीकडे ट्राफिक जाम झाला होता. आत गेल्यावर पार्कींग साठी बरीच मारामारी करावी लागली. आमच्यासारखेच सगळे उत्साही लोक तिकडे जमले होते. ९ वाजता ची शेवटची बोट फेरी होती, ती आम्हाला चुकवायची नव्हती. नशिबाने आम्हाला त्याची तिकीटं मिळाली. सगळे आपापल्या सीट्सवर जावून बसलो. बसल्या बसल्या वेगवेगळ्या pose मध्ये सेल्फी, फोटोज काढुन झाले. मी देखील सवयीप्रमाणे आणि लोक लाजेस्तव २-३ फोटोज काढले माझ्या मोबाईल मधुन. आश्चर्य म्हणजे माझ्या मोठ्या मुलाने मला आता बस म्हणुन फोटोला कंटाळल्याचा इशारा दिला. मी लगेच माझा मोबाईल bag मध्ये ठेवून दिला. बरं आपण साधारणपणे हे एवढे फोटोज घाईघाईने का काढतो तर १ नैतिक, सामाजिक जबाबदारी असते आपल्यावर हे फोटोज लगेच फेसबुक वर टाकायची. खरंच काय गम्मत आहे ना? आपण आत्ता कुठे आहोत नेमकं हे जगाला ओरडून सांगायची आपली सततची धडपड. इतकी गरज खरोखर आहे का? आमची १ मैत्रीण आहे ती सतत पोस्ट टाकत असते फेसबुक वर, आम्ही गमतीने म्हणतोही कधी तरी एखाद्या कार्यक्रमाला जायला जमलं नाही तर की फेसबुक उघडलं की हिचं पोस्ट असेलच की सगळी इत्थंभूत माहिती मिळायला. बरं सध्या आपण एवढ्यावरच थांबत नाही तर हे फोटोज whatsapp वर ही लगेच share केले जातात. आणि आता तर फेसबुक live मधुन live video recording ही टाकता येतं. नवीन किती गोष्टी काढू तेवढ्या कमीच आहेत. विळखा नाही हा १ प्रकारचा? साधारणत: ५०-६० लोक असतील त्या बोटीत. त्या बोटीचं वैशिष्ठ्य असं की त्या दिवशी बोटीतुन सगळ्यांना फटाक्यांची आतषबाजी दाखवणार होते. बोट सुरु झाली, मंद थंड वारा लागत होता तो थांबूच नये असंच वाटत होतं. १० मि. चं अंतर गेल्यावर बोट तिकडेच थांबली. आम्ही सगळे ९:३० ला सुरु होणाऱ्या आतषबाजीची उत्कंठतेने वाट पाहत होतो. अखेरीस पहिला रोषणाईचा फटका उडाला. सगळे एकदम alert झाले. तब्बल २० मि. हा कार्यक्रम चालु होता. मी आणि माझे कुटुंब सोडल्यास प्रत्येक माणसाच्या हातात मोबाईल होता आणि समोरचं ते मोहक दृश्य तो त्या ३ x २ स्क्रीनवर साठवत होता. किती ती काळजी आपल्याला भविष्याची आणि आपल्या मित्रांची जे त्या वेळेला तिकडे हजर नव्हते. मी सगळीकडे नजर घातली आणि मला एवढा धक्का बसला ते दृश बघुन की इतकी हाव आहे आपल्याला? आपला जो तो तिथला वेळ होता आणि जी संधी आपण मिळवली होती आपल्या मोठ्या उघड्या डोळ्यांनी ती रोषणाई बघायची ती आपण आपल्याच हावरटपणामुळे घालवून टाकली. इतकं ते दृश्य मोबाईल मध्ये साठवून ठेवणे गरजेचं होतं? मी मध्येच बायकोला म्हटलं की आजुबाजुला नजर टाक आणि बघ किती लोक प्रत्यक्ष दृश्य उघड्या डोळ्यांनी हक्काने न बघता त्या मोबाईल च्या छोट्याशा स्क्रीनमधून बघत आहेत ते. मला तेव्हा खुप वाईट वाटलं आणि कीव ही आली त्या सगळ्यांची. काही महिन्यांपूर्वी मी १ लेख वाचला होता अगदी ह्याच आशयाचा की माणुस वर्तमानकाळात न जगता भविष्यकाळासाठी जगत असतो.

आम्ही काही वर्षांपूर्वी Disneyland ला गेलो होतो, जाण्याआधी फोटो चा वेगळा, शुटींग चा वेगळा असे २ कॅमेरे भरले होते. तेव्हा आमच्याकडे कॅमकोर्डर ही नव्हता. विकत घ्यायचं डोक्यात होतं ह्या ट्रीप साठी पण मग एक उदार मित्र म्हणाला तेव्हढ्यासाठी घाईघाईने घेवू नकोस, आत्ता माझा कॅमेरा घेवून जा. सगळी जय्यत तयारी झाली, २ दिवस Disneyland फिरणार होतो. तिकडे पोहोचलो, at प्रवेश केल्यावर मी एवढा एक्साईट झालो की कुठल्या rides घेवू अशा गोंधळात पडलो इतक्या सुंदर त्या सगळ्या rides होत्या. आणि मग १ ride final केल्यावर लगेच घाईघाईने कॅमेरा काढला. कॅमकोर्डर माझ्याकडे आणि फोटोचा कॅमेरा बायकोकडे. अधून मधुन आम्ही आमच्या ३ वर्षाच्या मुलाला पण बघत होतो. एकूण ३ बाळ सांभाळत होतो. ज्या सुंदर ride मध्ये आम्ही बसलो होतो ती आम्ही उघड्या डोळ्यांनी बघण्यापेक्षा कॅमेरे manage करण्यातच घालवली. बायको दर २ मि. नी इकडे बघा की १ click आणि मी ही non-stop शुटींग करत होतो. सुदैवाने ती ride संपल्यावर आमच्या लक्षात आलं की इकडे तर इतक्या सुंदर rides आहेत की २ दिवस ही पुरणार नव्हते. मग असं सगळं शुटींग आणि एवढे धबाधब फोटो कोणासाठी काढायचे? इतरांसाठी? की आपल्याला पुढे आठवण म्हणुन? मनुष्याचा स्वभाव असतो की पुढे स्वत:साठी तजवीज करून ठेवू वगैरे. पण खरंच विचार करा की आपण हे सगळं नंतर त्या उत्साहाने खरंच बघतो का हो? मला तरी आठवत नाही की आम्ही त्या ट्रीप वरून आल्यानंतर कधी पुन्हा ते फोटोज एवढे श्रद्धाळूरीत्या बघितलेत. म्हणजे नुसतं साठवत जायचं आणि मग आयुष्यात पुन्हा ते बघायची वेळच येत नाही. आणि आपल्या पश्चात काय माहीत कोणी इतर ते बघुन किती त्याचा आनंद घेवू शकतील. त्या १ ride नंतर आम्ही दोघांनीही ठरवलं की ही आपली ट्रीप आहे, एवढे पैसे खर्च करून आलोत. सगळे एकत्र हे उघड्या डोळ्यांनी अनुभवूया. ज्यांना बघायचं ते येतील पैसे खर्च करून आणि ते त्याचा आनंद त्यांच्या परीने घेतील. खरं सांगतो त्यानंतर आम्ही २ दिवस एवढे enjoy केले, स्क्रीन हलतेय का, हे कव्हर केलंस का, हा थोडा बाहेर गेला, थोडा हलला फोटो वगैरे भानगडच नाही. तसे फोटोज अगदीच काढलेच नाहीत असं नाही पण उगाच भाराभर काढत बसलो नाही. माझा १ मित्र त्याला तर फोटोज काढायची एवढी हौस की तो एखाद्या छोट्या event चे ही २००-३०० फोटोज सहज काढतो. बरं अजुन असे ही काही लोक बघितलेत मी की ते कुठे ट्रीपला गेले असतील तर तिथून आल्यानंतर ते फोटोज दुसरयाला खुप चवीचवीने दाखवतात. काहींकडे तर अशी ही कला आहे की जे त्या फोटोत दिसत नाहीये त्याबद्दल ही भरपूर माहिती देवू शकतात. मला तर असं कोणी विचारलंच तर प्रचंड गोळा येतो पोटात. म्हणजे तुम्ही काय ती धम्माल केलीत ना मग आम्ही ही करू आमच्या पद्धतीने, कुवतीप्रमाणे. त्या सगळ्याचं विश्लेषण कशाला? असो शेवटी काय हो मनुष्य स्वभाव. त्या वेळेस फेसबुक वगैरे एवढं परिचित नसावं, नाहीतर इकडे फोटो काढला की लगेच तिकडे फेसबुक वर टाकलाच समजायचं.

आणि अजुन १ विळखा म्हणजे आजकाल आपला latest status इतरांना कळून द्यायचा असतो. उदाहरणार्थ, सेल्फी काढुन लिहायचं की at सिनेमा, in concert, with school mates वगैरे वगैरे. संडासात बसलोय हे ही टाका म्हणावं, ते ही फोटो सकट कुथताना. काही वर्षांपूर्वी मी एका मैफिलीला गेलो होतो, स्टेजवरचे Artists सुद्धा मधल्या वेळेत फेसबुक आणि whatsapp वर सगळं update करत होते. हे मात्र बघून मी थक्कच झालो. इतकी गरज आहे का? पूर्वी काही जण संडासात वर्तमानपत्र नेत असत, आता सगळे मोबाईल नेतात. चुकून त्यानेच सगळी साफ-सफाई केली नाही म्हणजे मिळवलं. आपण आणि आपली पिढी ह्यातुन खुप लवकर बाहेर यायला हवंय. दिवसातला दररोज अर्धा तास मोबाईल अजिबात बघायचा नाही मोकळं बसलेलो असताना देखील. अवघड आहे पण सुरुवात तर करून बघुया , आपण केलं तर आपली पुढची पिढी त्याचं अनुकरण करू शकेल. ह्या विळख्यातून बाहेर पडूया सगळे.

शेवट करताना १ सेल्फी घेतो आणि फेसबुकवर टाकतो की busy in a new story. 

 

Imprint

Publication Date: 10-20-2017

All Rights Reserved

Free e-book «Vilkha, Nishad Kanhere [good books for high schoolers txt] 📗» - read online now

Comments (0)

There are no comments yet. You can be the first!
Add a comment